Ad will apear here
Next
श्री महालक्ष्मी अप्रसन्न होण्याची मुख्य कारणे... (भाग दोन)
श्री महालक्ष्मी तत्त्वाचे स्वरूप, तसेच श्री महालक्ष्मी अप्रसन्न होण्याची काही कारणे आपण आधीच्या लेखांत पाहिली. आजच्या भागात उर्वरित तांत्रिक मुद्दे आणि श्री महालक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी काय करावे, याची माहिती...
.........
श्री लक्ष्मीदेवी अप्रसन्न होण्याची कारणं नीट लक्षात घेऊन त्यावर काम केलंत तर तिच्या आगमनाचे मार्ग खुले होतात, हे विसरू नका... श्री महालक्ष्मी हे एक प्रतीकात्मक दैवत आहे. आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर्य, श्रीमंती, मानमरातब, नोकरचाकर, वाहनसौख्य, उत्तम वास्तूचे सुख हवे असते. हे सर्व प्रदान करणारी मातृस्वरूप देवता म्हणजे श्री महालक्ष्मी. पैशाची, ऐश्वर्याची देवता ही स्त्री का आहे, यामागचे कारण म्हणजे स्त्री हे मातृत्वाचे प्रतीक मानले आहे. आई ही आपल्या मुलांच्या बाबतीत कायमच केअरिंग असते, पॉझिटिव्ह असते आणि तिची सर्व मानसिक शक्ती तिने अपत्यांच्या शुभत्वासाठी दिली, तर ब्रह्मदेव जरी आडवा आला, तरी तिच्या अपत्यांचं वाईट होऊच शकत नाही. या उदात्त भावनेतून सर्व शुभ गुणांनी युक्त अशी ही देवता आपल्या सर्वांचं मंगल करो, हीच तिच्याकडे प्रार्थना आहे...

- अनेक लोकं घरात व्यवस्थितपणे मद्यपान करतात. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याविषयी माझे काहीच मत नाही; पण ज्या घरात सकाळी पहिल्या काही प्रहरांत (सकाळी नऊच्या आधीपासूनच) आणि संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास (अंदाजे संध्याकाळी सहा ते रात्री आठ) मद्यपान केले जाते, तिथे महालक्ष्मीचा निवास नसतो. तुम्ही म्हणाल, असं किती तरी श्रीमंत घरात होतं... बरोबर आहे. तिथे जी संपत्ती असते तिला अलक्ष्मी किंवा आक्काबाई म्हणतात. ज्या घरात वाममार्गाने संपत्ती येते, ज्या घरात वरील दोन वेळी मद्यपान केले जाते, ज्या घरात राजरोस वेश्यागमन, जुगार खेळला जातो, तिथे श्री महालक्ष्मी टिकत नाही. तिथे अलक्ष्मीचा निवास असतो. अलक्ष्मी ही महालक्ष्मीची बहीण असून, ती घरात आल्यास पैसा येतो; पण त्याबरोबर क्लेश, अनारोग्य, परस्परांशी बिघडणारे संबंध, तळतळाट, वादविवाद यांचा निवासही निर्माण होतो हे विसरू नका. आपल्याला फक्त पैसाच नकोय. पैशाच्या सोबत मन:शांती, सुयश, सुप्रतिष्ठा, आरोग्यसंपन्नता, आनंदी वातावरण, मानमरातब या गोष्टीही हव्या आहेत... त्यालाच श्री म्हणतात. मागेच सांगितल्याप्रमाणे दारू, जुगार आणि वेश्यागमनावर खर्च होणारा पैसा हा माणसाला आज ना उद्या अधोगतीलाच नेतो हे सत्य आहे. अनेकांना ते सत्य उशिरा समजते.... ‘अरे सचिनभाई, पैसा अपने तकदीर से मिलता है, शराब से कुछ नै होता’ असं म्हणणारा एक अतिशहाणा नवश्रीमंत रोज संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळीच प्यायला बसत असे. त्याचा शेवट अतिशय हलाखीत झाला, हा माझा बघितलेला स्वानुभव मी सांगतो. 

- ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जात ना, जिथे तिला अत्यंत हीन दर्जाची वागणूक मिळते. ज्या घरात तिचा छळ आणि पदोपदी अपमान होतो, तिथेही श्री महालक्ष्मीचा निवास नसतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पुरुषांनी घरातील स्त्रिया, मग त्या तुमची आजी, आई, बायको, मुलगी कोणीही असो, तिला योग्य तो सन्मान द्यायलाच हवा. तिच्या मनाची जपणूक करणं, तिला कोणत्याही प्रकाराने शारीरिक-मानसिक वेदना होणार नाहीत, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. ज्या घरात स्त्री आनंदी/सुखी व सन्मानित आहे, तिथे श्री लक्ष्मीचा चिरकाल निवास होतो हे निश्चित आहे. 

- पैशाच्या विनियोगाचे तंत्र : आज घरात आलेला पैसा (नाणी/नोटा/रक्कम) चुकूनही आजच्या आजच खर्च करू नये हे कायम लक्षात असू द्यावे. आज कमावलेला पैसा हा निदान एक रात्र आपल्या घरी मुक्कामाला ठेवावा व पुढील दिवशी ती रक्कम किंवा त्या नोटा-नाणी खर्च करायला हरकत नाही. पैशाचा विनियोग करतानाही, वस्तूखरेदी किती आवश्यक आहे, याचा पूर्ण विचार करून मगच खरेदी करा. व्यक्तिश: मला स्वत:ला पैसा खर्च करणे आवडते, हो अगदी मनापासून आवडते; पण मी गरजांची क्रमवारी लावायला नुकताच शिकलो आहे आणि त्याचा बराच फायदाही होतो आहे. अनावश्यक आणि सढळ हाताने खर्च करण्यावर मर्यादा आली आहे. 

- एका लहानशा डायरीत किंवा आजकाल मोबाइलवरही अशी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत, की ज्यावर तुम्ही दिवसभरात केलेल्या खर्चाची मांडणी करू शकता. तशी करत राहा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केलेल्या खर्चाची नोंद ठेवा... आणि दर आठवड्यातून एकदा ती चेक करा. मागच्या आठवड्यात केलेल्या मूर्ख खर्चांची पुनरावृत्ती परत न करण्याचा निर्धार करा. सहा महिन्यांत बरीच रक्कम शिल्लक राहायला सुरुवात होईल की नाही बघा.... Expense Manager नावाचे अॅप्लिकेशन आहे ते बघा. 

- राहत्या घरात वर्षातून किमान एकदा तरी ज्यात हवनविधी आहे (अग्नितत्त्व) असे आणि किमान एकदा उदकशांती किंवा अभिषेक (ज्यात जलतत्त्वाचा समावेश आहे) असे दोन विधी योग्य व जाणकार गुरुजींकरवी करून घ्यावेत. वार्षिक सत्यनारायण करत असाल, तर त्या पूजेच्या सुरुवातीलाच भगवान विष्णूंवर पुरुषसूक्त एकादष्णी (पंचामृत अभिषेक) करून मगच पूजेला सुरुवात करावी. हवनविधीमध्ये साधारण नवग्रह शांती, गणेशयाग किंवा दुर्गासप्तशतीचा हवनयुक्त पाठ केला तरी पुरेसा आहे; पण अग्नी व जलतत्त्वाशी संबंधित विधी राहत्या घरात/निवासस्थानी (ते भाड्याचे असले तरीही चालेल) करावेत. अग्नितत्त्वाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जलतत्त्वाने श्री लक्ष्मीला प्रिय असलेली शांत व सकारात्मक तत्त्वे जागृत होतात, हे सत्य आहे. 

- वास्तुशास्त्रानुसार घरातील रोख रक्कम शक्यतो घराच्या आग्नेय दिशेला (South East) आणि वायव्य दिशेला (North West) ठेवू नये. या दोन्ही दिशांकडचा पैसा हा लवकर खर्च होतो. इतर कोणत्याही दिशेला पैसा ठेवायला हरकत नाही, दक्षिण दिशाही एकवेळ चालेल पण वरील दोन दिशा नकोत. वास्तूत तुळस, पारिजातक, अनंत ही शुभफलदायक झाडे असावीत. देवघरात कुलस्वामिनीचा फोटो/टाक आणि श्री बाळकृष्णाची (रांगता) मूर्ती असणे क्रमप्राप्त आहे. श्री अन्नपूर्णा देवीची भरीव मूर्ती असायला हवी. तुमच्याकडे आलेली रक्कम ही परस्पर कुठेही बाहेरच खर्च न करता आधी देवासमोर काही काळ ठेवून अत्यंत कृतज्ञतेने नमस्कार करून, ती रक्कम एक रात्र मुक्कामास ठेवून मग दुसऱ्या दिवशी खर्च करण्याची सवय लावून घ्या... 

अशी अजून बरीच कारणे आहेत, त्याविषयी पुढे कधी तरी लिहीनच. काही गूढ स्तोत्रांविषयी आणि मंत्रांविषयीही पाहू या पुढील लेखात...

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZXOCK
Similar Posts
श्रीमहालक्ष्मी अप्रसन्न होण्याची मुख्य कारणे (भाग एक) महालक्ष्मी हे नेमकं काय तत्त्व आहे, त्याचं स्वरूप आणि कारणमीमांसा याबद्दल आपण आधीच्या लेखात पाहिले आहे. या लेखात पैशाच्या अभावाची मुख्य कारणे, पैसा न टिकण्याची कारणे किंवा आलेला पैसा जेमतेम एका पिढीपुरता टिकून पुढची पिढी कंगाल होण्यामागची कारणे यांचा ऊहापोह करू या... पालघर येथील ज्योतिष तज्ज्ञ सचिन मधुकर परांजपे यांचा लेख
श्री महालक्ष्मीचे गुणधर्म आपल्याला श्री महालक्ष्मीची प्राप्ती व्हावी, अर्थात धन, संपत्ती, सुबत्ता मिळावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते; पण ती प्राप्त होण्यासाठी काय करायला हवे आणि काय टाळायला हवे, याची जाणीव प्रत्येकाला असतेच असे नाही. पालघर येथील ज्योतिषतज्ज्ञ सचिन मधुकर परांजपे यांनी त्या विषयाबद्दल केलेले मार्गदर्शन काही लेखांमधून आपण पाहणार आहोत
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सात आजच्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक आठ आणि नऊ अभ्यासणार आहोत. या ऋचा पुढीलप्रमाणे आहेत.
श्रीलक्ष्मीनारायणाष्टकम् मी आजवरच्या माझ्या अनेक लेखांमध्ये श्रीलक्ष्मी मातेची उपासना करण्याआधी भगवान श्री विष्णूंचे स्मरणचिंतन किंवा ध्यान करणे आवश्यक आहे हे सांगितले आहे. लक्ष्मीनारायण हे उभयतां एकमेकांपासून कधीच विभक्त मानले जात नाहीत. ते अद्वैतरूपी एकात्म साधून असतात. त्यातही श्री विष्णूंवर पत्नी श्री लक्ष्मीची अतीव प्रीती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language